अहमदनगर,(प्रतिनिधी) – राज्य शासनाच्यावतीने दि. १ जानेवारी २०२४ ते १५ फेब्रुवारी २०२४ दरम्यान विदयालयात ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान यशस्वीपणे राबविले गेले. शासनाने ठरवून दिलेल्या परीपत्रकाप्रमाणे एकूण 30 समित्या स्थापन केल्या गेल्या. 100 गुणांच्या या अभियानात अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भिंगार येथील भिंगार हायस्कूलने 99 गुण मिळवून जिल्हयात प्रथम क्रमांकाचे 11 लाखांचे पारितोषिक मिळविले आहे.
अभियानादरम्यान शाळा व शाळेतील परिसर स्वच्छता, सुविचार लेखन, वृक्षारोपनण या बरोबरच तंबाखूमुक्त, प्लास्टिकमुक्त या विषयावरही विद्यालयाने काम केले. या काळात महावाचन, आरोग्य तपासणी, कौषल्याधिष्ठीत शिक्षण, सांस्कृतिक कार्यक्रम, वक्तृत्व स्पर्धा, निंबध स्पर्धा, विद्यार्थी मंत्रीमंडळ, परसबाग, एन.सी.सी. उपक्रम, अमृतवाटिका, पोषण आहार सहभाग, स्वच्छतादूत, बचत बँक असे उपक्रम राबविले गेले. यात इयत्ता ५ वी ते १२वी च्या एकूण १६५२ विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
विद्यार्थी मंत्रीमंडळ स्थापन करताना गुप्त मतदान पध्दतीचा वापर करून विद्यार्थ्यांना लोकशाहीतील मतदानाचा प्रत्यक्ष अनुभव दिला गेला. अभियाना दरम्यान शहरातील व भिंगार गावातील आरोग्य क्षेत्रात काम करणारे डाॅक्टर, पर्यावरण तज्ञ, सरपंच, बँकेतील अधिकारी, औद्यौगिक प्रशिक्षण संस्थेतील तज्ज्ञ मार्गदर्शक, क्रीडा क्षेत्रातील मार्गदर्शक, लेखक यांची व्याख्याने विद्यार्थ्यांसाठी आयोजित केली गेली.
या अभियानाच्या यशस्वीतेसाठी अहमदनगर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अभय फिरोदिया, उपाध्यक्ष अशोक मुथा, प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, सहकार्यवाह गौरव फिरोदिया, खजिनदार प्रकाश गांधी व विश्वस्त मंडळाचे व शाळा समितीच्या सर्व सदस्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
अभियानात विदयालयाचे पदाधिकारी प्राचार्य पडोळे, उपप्राचार्य कासार, पर्यवेक्षिका व अभियानाच्या मुख्य निमत्रंक सौ. गायकवाड, सर्व शिक्षक, सेवक, विदयार्थी व पालक यांचा सक्रिय सहभाग असल्याने हे अभियान यशस्वी झाले. ‘‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’’ या मधील कृती समितीत काम करताना विद्यार्थ्यांमध्ये संशोधकवृत्ती, वेळेचे योग्य नियोजन, सहकार्य, वाचन लेखन कौशल्य, स्वजाणीव, संवेदनशिलता, निसर्गप्रेम, जबाबदारी, नेतृत्व, आरोग्याबाबत जागरूकता इ. गुणांचा विकास झाला.