निसर्ग व पर्यावरणाशी जोडलेल्या नाटकाचा बालकांनी लुटला आनंद
अहमदनगर,दि.९ जून,(प्रतिनिधी) – सेवाप्रीत सोशल फाउंडेशनच्या महिला सदस्यांनी अनाथ, निराधार व गरजू विद्यार्थ्यांना बालनाट्य पाहण्याची नुकतीच संधी उपलब्ध करुन दिली. युवान या सामाजिक संस्थेमार्फत विविध अनाथाश्रमांतील पाचशे मुलांना बालनाट्य दाखविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला होता. यामध्ये सेवाप्रीतने आर्थिक सहयोग देऊन विद्यार्थ्यांसाठी बोक्या सातबंडे नाटकाची पर्वणी उपलब्ध करुन दिली.
माऊली सभागृहात रंगलेल्या या नाटकात 2 तास बालके रममाण झाली होती. नाटकाचा आनंद घेताना निरागस बालकांच्या चेहर्यावर हास्य व समाधान फुलले होते. अभिनेते तथा लेखक दिलीप प्रभावळकर लिखित बोक्या सातबंडे या नाटकात नगरचा नवोदित बालकलाकार आरुष प्रसाद बेडेकर याने प्रमुख व्यक्तिरेखा साकारली आहे. नाटकातील प्रत्येक प्रसंगाला बाल रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली.
उन्हाळी सुट्टीचा आनंद वंचित घटकातील मुलांनाही घेता यावा, या उद्देशाने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी सेवाप्रीतच्या अध्यक्षा जागृती ओबेरॉय, ग्रुप लिडर गीता माळवदे, तृप्ती कोठारी, आरती कुलकर्णी, मनिषा कंक, पूजा गोंडाल, दिपाली देऊतकर, अंजली गायकवाड, माधुरी येलई, स्मिता देशमुख, उर्मिला सायंबर, भारती यादव, निशा पाटील, सोनिया कुंद्रा, वैशाली उट्टेकर, वंदना गोसावी, स्मिता मालवे, संगिता भागवत, जया रोहमने, रोहिणी पाटील, प्रियंका पारेख, सोनी पारेख, अमित बठेजा आदी उपस्थित होते.
जागृती ओबेरॉय म्हणाल्या की, सर्वच कुटुंबातील लहान मुले उन्हाळी सुट्टी विविध प्रकारे आनंदाने साजरी करतात. मात्र अनाथ, निराधारांना वस्तीगृहातच या सुट्टी घालवावी लागते. त्यांनी उन्हाळी सुट्टी आनंददायी करण्याच्या उद्देशाने युवान द्वारे घेण्यात आलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे त्या म्हणाल्या. तर यापुढील काळातही युवानच्या सामाजिक कार्यास सहकार्य करण्याचे त्यांनी आश्वासन दिले. या कार्यक्रमाला आलेले पाहुणे व बालकांना सेवाप्रीतने वृक्षरोपणासाठी रोप भेट देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. तर सर्व बालकांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.