सर्वत्र घाणीचे साम्राज्य, कारखानदार कामगारांचा रास्ता रोकोचा इशारा
अहमदनगर,दि.८ जून,(प्रतिनिधी) – केडगावच्या इंडस्ट्रियल इस्टेट मध्ये निर्माण झालेल्या ड्रेनेजलाईनच्या दुरावस्थेची पहाणी नगरसेवक अनिल शिंदे यांच्यासह शहर अभियंता श्रीकांत निंबाळकर व स्थानिक उद्योजक कारखानदारांनी केली. यावेळी नगरसेवक शिंदे यांनी सदर प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी शहर अभियंता निंबाळकर यांना सूचना केल्या.
यावेळी अहमदनगर इंडस्ट्रियल इस्टेट को. ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन सतीश बोरा, व्हाईस चेअरमन नितीन पटवा, अरविंद गुंदेचा, नेहूल भंडारी, प्रमिला बोरा, राजेंद्र चोपडा, संतोष बोरा, संतोष बोथरा, सोनल चोपडा, प्रमोद बोरा, आनंद देसर्डा, योगेश मंत्री, अप्पासाहेब गावडे, संजय रांका, नरेंद्र चोरडिया, देवेंद्र गांधी, मनिष झंवर, अरुण झंवर, सुनिल मुनोत, अजित कर्नावट, प्रणव कटारिया आदी उपस्थित होते.
केडगाव येथील इंडस्ट्रियल इस्टेट मधील कारखानदार कामगारांनी अनेक महिन्यांपासून केलेल्या पाठपुराव्यानंतर अखेर महापालिकेने या परिसरातील ड्रेनेज लाईनच्या कामाला सुरुवात केली होती. मात्र मागील पंधरा दिवसापासून सदरचे काम बंद पडले आहे. त्यात झालेल्या पावसामुळे येथील ड्रेनेजलाईनची दाणदाण उडून घाण पाणी रस्त्यावरुन वाहू लागले आहे. ड्रेनेजचे घाण पाणी रस्त्यावरुन वाहताना परिसरात घाण पाण्याचे मोठे तळे साचले आहे. तर संपूर्ण परिसरात दुर्गंधी पसरली आहे. येथील कारखानदार, कामगार, महिला व स्थानिक नागरिकांना रस्त्यावरुन जाणे अवघड झाले असून, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ड्रेनेजलाईनच्या दुरावस्थेमुळे अनेक महिन्यापासून कारखानदार, कामगार नरक यातना भोगत असल्याची भावना उपस्थित कारखानदारांनी व्यक्त केली. शहर अभियंता निंबाळकर यांनी सदर प्रश्न पाच दिवसात सोडविण्याचे उपस्थितांना आश्वासन दिले.
ड्रेनेजलाईनच्या दुरावस्थेमुळे संपूर्ण केडगावच्या इंडस्ट्रियल इस्टेटचे आरोग्य धोक्यात आले आहे. परिसरात दुर्गंधी पसरली आहे. 180 कारखान्यातील कामगारांचा हा प्रश्न आहे. सर्व कारखानदार वेळेवर महापालिकेचे कर भरत असून देखील नागरी सुविधा मिळण्यापासून अडचण निर्माण होत आहे. येत्या पाच दिवसात हा प्रश्न मार्गी न लागल्यास कारखानदार, कामगार यांच्यासह नगर-पुणे महामार्गावर शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको करण्याचा इशारा नगरसेवक अनिल शिंदे यांनी दिला आहे.