मुंबई, ८ जून २०२३ – छत्रपती संभाजीनगरातील वाढती गुन्हेगारी लक्षात घेऊन रात्री ११ वाजेनंतर शहर बंद करण्याचा निर्णय पोलिस आयुक्त मनोज लोहिया यांनी घेतला आहे. त्यासाठी गुन्हेशाखा कामाला लागली आहे.
छत्रपती संभाजीनगर शहरात मागील दोन आठवड्यांपासून चाकू हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. किरकोळ भांडण झाले तरी लोक थेट चाकूने भोसकू लागले आहे. घरात, रस्त्यावर, गल्लीत कोठेही या घटना घडत आहे. त्यामुळे नियमानुसार रात्री ११ वाजेनंतर शहर बंद झाले पाहिजे; अशी भूमिका पोलिस आयुक्त लोहिया यांनी घेतली आहे. त्यासाठी त्यांनी प्लॅन तयार केला आहे. सुरुवातीला सर्व ठाणेदारांना आपल्या हद्दीत ११ वाजेनंतर आस्थापना उघड्या राहणार नाहीत. याची काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. रात्री साडेदहा वाजेनंतर सहा पथके एकाच वेळी रस्त्यावर उतरतायत. ती वेगवेगळ्या भागांत जाऊन आस्थापना बंद करण्याचे कालपासून आवाहन सुरू केले आहे.