अहमदनगर,दि.७ जून,(प्रतिनिधी) – यंदा दिनांक २९ जून रोजी आषाढी एकादशी आहे. ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने वारकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्ताने लाखो वारकरी पंढरपुरमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल होतात. अनेक वारकरी हे पायी चालत आलेले असतात. त्यामुळे पंढरपुरमध्ये आल्यानंतर अनेकांना आरोग्याशी संबंधीत समस्यांचा सामना करावा लागतो.
यंदाच्या आषाढी वारीला राज्य सरकारकडून वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी पंढरपूर येथील यात्रेत राज्य शासनाच्या वतीने ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ हे महाआरोग्य शिबीर राबवले जाणार आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी याविषयी माहिती दिली आहे.
तानाजी सावंत यांनी सांगितले की, यंदाच्या आषाढी यात्रेमध्ये पंढरपुरात प्रथमच राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ ह्या संकल्पनेवर आधारित हे महाआरोग्य शिबीर २८ आणि २९ जून रोजी पंढरपुरात राबवण्यात येणार आहे.
या शिबिरात सुमारे २० लाख भाविकांच्या आरोग्याची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी राज्यातील वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टर्स यांच्यासह परराज्यातून देखील वैद्यकीय पथकं बोलण्यात येणार आहे. पंढरपुरात ३ ठिकाणी हे आरोग्य शिबिर राबवले जाईल.
यामध्ये आरोग्य शिबिरासोबतच वारकरी भक्तांना सकस आहार देखील दिला जाणार आहे. याबाबत आज आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर येथे बैठक घेण्यात आली.