केडगाव,दि.२१ मे २०२३,(प्रतिनिधी) – पोस्ट ऑफिसमधून एक एप्रिल पासून महिला सन्मान बचतपत्र या योजनेस देशभर प्रारंभ करण्यात आला. या योजनेच्या केडगाव मधील पहिल्या बचतपत्राच्या मानकरी श्रीमती जयश्री कोतकर व दुसऱ्या खातेदार सौ विनिता हजारे बचतपत्राचे वितरण सन्मानपूर्वक श्रीमती जी हनी (अधिक्षक डाकघर, अहमदनगर) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. संतोष यादव यांनी या योजनेची प्रभावी प्रचार यंत्रणा राबवत अवघ्या दिड महिन्यात या योजनेचे शंभर खाते उघडण्याचा विक्रम अहमदनगर विभागात केला. केंद्र सरकारने आझादी का अमृत महोत्सवानिमित्त खास महिला व मुली करिता सुरू केलेली आहे.
या योजनेचा प्रारंभ दि १ एप्रिल पासून संपूर्ण देशभरातील पोस्ट ऑफिस मधून झालेला असून सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळत आहे. पोस्ट ऑफिसच्या इतर अल्पबचत योजनेपेक्षा अधिक व्याजदर देणारी ही योजना असून, यामध्ये फक्त महिला व मुलीच सहभागी होऊ शकतात. दोन वर्षकरिता असणारी योजनेमध्ये कमीतकमी एक हजार तर जास्तीतजास्त दोन लाख रु गुंतवणूक करू शकता. या योजनेस ७.५०% व्याजदर आहे. एकच खातेदाराच्या नावे दोन नवीन खात्यामधील अंतर हे ३ महिने असणे गरजेचे आहे.
या योजनेची दि.१६ मे ते १५ जून २०२३ या दरम्यान अहमदनगर विभागातील सर्वच पोस्ट ऑफिस मध्ये विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आलेले असून जास्तीतजास्त महिला व मुलींनी यात सहभागी व्हावे असे आवाहन संतोष यादव पोस्टमास्टर केडगाव यांनी केले आहे.