मुंबई, १३ मे २०२३ – मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचं निलंबन मागे घेतले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात परमबीर सिंह यांचं निलंबन करण्यात आले होते.
आज सरकारने हा निर्णय मागे घेत परमबीर सिंह यांना मोठा दिलासा दिला आहे. दरम्यान, निलंबन मागे का घेतले यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “परमबीर सिंह यांच्याबाबत कॅट’ने एक निर्णय दिला. ज्यात परमवीर सिंग यांची विभागीय चौकशी चुकीची ठरवत ती बंद करण्याचा निर्णय दिला. सोबतच त्यांचं जे निलंबित केलं होते, ते सुद्धा मागे घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने देखील निलंबनाचा निर्णय मागे घेतला आहे, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले आहे.
अँटेलिया येथील स्फोटकांचं प्रकरण आणि राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या १०० कोटी रुपयांच्या वसुलीच्या आरोपामुळे परमबीर सिंह हे वादात सापडले होते. त्यानंतर तत्कालीन महाविकास आघाडी सरकारकडून सिंह यांचं निलंबन केलं होते.
मात्र, निलंबनानंतर मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आल्यानंतर परमबीर सिंह यांनी तेव्हा थेट तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधातच दंड थोपटले होते. सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना एक भलंमोठं पत्र लिहीत अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचारासह वसुलीचे गंभीर आरोप केले होते.