मुंबई,८ मे २०२३(ऑनलाईन वृत्त)- शिंदे गटाचे १६ आमदार अपात्र ठरणार का सरकार कोसळणार की टिकणार? असे अनेक प्रश्न राज्यातील जनतेला पडलेले आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी होऊन जवळपास दोन महिन्यांचा कालावधी उलटून गेला. आता सर्वांनाच निकालाची उत्सुकता लागली आहे. या सुनावणीनंतर आता सर्वोच्च न्यायालय काय निकाल देऊ शकतो? यासंदर्भात चर्चा सुरू असतात. दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निकालासंदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे.
“सर्वोच्च न्यायालयाचे एक न्यायमूर्ती निवृत्त होणार आहेत. त्यामुळे १६ आमदारांच्या अपात्रतेचा निकाल लवकर लागेल”, असा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. शरद पवार आज सांगोला येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर ही भविष्यवाणी केली आहे.
राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे झाली होती. घटनापीठाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतला. त्यानंतर निकाल राखून ठेवला आहे. आता हा निकाल कधी लागणार याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे.
न्यायालयाच्या कामकाजाच्या यादीत एक दिवस आधी त्या निकालाची तारीख दिलेली असते. त्यामुळे राज्याच्या सत्तासंघर्ष प्रकरणाचा निकाल लागेल तेव्हा एक दिवस आधीच त्याची तारीख जाहीर होईल. ही तारीख नेमकी काय असणार? याची उत्सुकता आहे. सत्तासंघर्षाच्या या निकालावरच महाराष्ट्राचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.