मुंबई, २ मे २०२३ (ऑनलाईन वृत्त) – शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा मोठा निर्णय दिला आहे. त्यांच्या या निर्णयानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले आणि त्यांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. शरद पवारांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. कार्यकर्त्यांच्या या भावनिक साथेनंतर शरद पवारांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. ‘कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेता एक कमिटी स्थापन करुन पुढील निर्णय घेतला जाईल.’, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सांगितले आहे.
अजित पवारांनी सांगितले की, ‘तुमच्या भावना साहेबांना कळाल्या आहेत. साहेबांनी एक आवाहन केले आहे. पक्षाची कमिटी पुढचा निर्णय घेईल. ही कमिटी एकंदरीत लोकांचा आलेला कौल लक्षात घेईल. या कमिटीनेच पुढच्या गोष्टी ठरव्यात. ते जे ठरवतील ते साहेबांना मान्य आहे.
अजित पवारांनी पुढे सांगितले की, कमिटी म्हणजे कुठली बाहेरची लोकं नाहीत. या कमिटीत राष्ट्रवादी काँग्रेस परिवारातीलच लोकं असतील. मी असेल सुप्रिया असेल आणि इतर सर्वजण असतील.’ तसंच, ‘तुम्ही जी भावनिक साथ साहेबांना घातली आहे ती आमच्या सर्वांच्या लक्षात आली आहे. कमिटी तुमच्या मनातला योग्य निर्णय घेईल. ऐवढी खात्री मी तुम्हाला देतो.’, असे अजित पवारांनी स्पष्टपणे सांगितले.
‘राष्ट्रवादी काँग्रेसची कमिटी लोकांच्या मनामध्ये काय आहे ते जाणून घेईल आणि पुढील निर्णय घेईल.’ असं देखील अजित पवारांनी यावेळी सांगितलं आहे.