अहमदनगर,दि.१ मे,(प्रतिनिधी) – महिला नेत्याबद्दल अपशब्द वापरणं अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूरच्या एका भाजपच्या नेत्याला चांगलच महागात पडलं आहे. याप्रकरणी न्यायालयाने भाजप नेत्याला तब्बल 1 कोटींचा दंड ठोठावला आहे. श्रीरामपूरच्या तत्कालीन नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांच्याबाबत भाजपचे प्रकाश चित्ते यांनी अपशब्द वापरले होते. या प्रकरणी श्रीरामपूर दिवाणी न्यायालयाने प्रकाश चित्ते यांना 1 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
अनुराधा आदिक यांच्याबद्दल 2021 साली केलेले वक्तव्य प्रकाश चित्ते यांच्या चांगलच अंगलट आले आहे. अनुराधा आदिक यांनी दाखल केलेल्या मानहाणीच्या खटल्यात श्रीरामपूर दिवाणी न्यायालयाने प्रकाश चित्तेंना 1 कोटींचा दंड ठोठावला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजयंतीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यावरून वाद निर्माण झाला होता. या वादातून प्रकाश चित्ते यांनी अनुराधा आदिक यांच्यावर आरोप करत त्यांच्याविषयी अपशब्द वापरले होते.
त्यानंतर याविरोधात अनुराधा आदिक यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला होता. या प्रकरणी अनुराधा आदिक यांनी 2021 मध्ये प्रकाश चित्ते यांच्याविरोधात श्रीरामपूर येथील दिवाणी न्यायालयामध्ये पाच कोटींच्या मानहानीचा दावा दाखल केला होता. दरम्यान, या प्रकरणामध्ये न्यायालयाने आता प्रकाश चित्ते यांना एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.