अहमदनगर,दि.७ मार्च,(प्रतिनिधी) – नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील स्व.पै.किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त भरोसा सेल व निर्भया पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी उंबरहंडे देशमुख यांना आदर्श पोलीस अधिकारी पुरस्कार हा नुकताच जाहीर करण्यात आला आहे. निमगाव वाघा येथे न्यू मिलन मंगल कार्यालयात गुरुवार दिनांक ९ मार्च रोजी सकाळी १० वा.जागतिक महिला दिनानिमित्त मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती स्व.पै.किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा निमगाव वाघाचे ग्रामपंचायत सदस्य नाना डोंगरे यांनी दिली आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक पल्लवी उंबरहंडे -देशमुख यांनी महिला दक्षता समिती, विशाखा समिती, महिला सुरक्षा समितीच्या माध्यमातून अनेक उध्वस्त झालेले संसार उभे केले आहेत. महिला अत्याचाराचे निवारण करून अनेक भगिनींना संरक्षण मिळवून देण्याचे काम केले आहे. तसेच भरोसा सेल अंतर्गत दामिनी व निर्भया पथक या माध्यमातून शाळा, कॉलेज, उद्याने, बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, इतर गर्दीच्या ठिकाणी गस्त घालून महिला मुलींविषयी घडणाऱ्या गुन्हांना प्रतिबंधक कारवाई करून उत्कृष्ट कार्याचा ठसा उमटविला आहे. शाळा कॉलेजमधील मुलींना महिला विषयक कायदे त्यांचे अधिकार तसेच स्वसंरक्षणाचे धडे देऊन जनजागृती केली आहे. तसेच राज्य महिला आयोग,राष्ट्रीय महिला आयोग यांचे कडील तक्रारदारांना न्याय मिळवून देण्याचे काम केले आहे. तसेच तक्रारदारांचे योग्य यंत्रणेमार्फत निरसन करण्याचे कार्य केले आहे. महिलांना योग्य न्याय मिळवून देण्याचे कार्य तसेच न्याय हक्कासाठी लढण्याविषयी जनजागृती करून महिलांच्या सबलीकरणासाठी आपण मोठे योगदान दिले आहे. यामुळे डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आपणास आदर्श पोलीस अधिकारी पुरस्काराने गौरविण्यात येत आहे असे नाना डोंगरे यांनी सांगितले आहे.