दिल्ली,दि.१९ फेब्रुवारी,(ऑनलाईन वृत्त) – बॉर्डर गावसकर कसोटी मालिकेतील सलग दुसरा कसोटी सामना भारताने आपल्या खिशात घातला. या विजयासह भारताने मालिकेत 2-0 आघाडी घेतली आहे. भारताने पहिला कसोटी सामना एक डाव आणि 132 धावांनी जिंकला होता. त्यानंतर आता दुसरा कसोटी सामना भारताने 6 गडी राखून जिंकला आहे.
दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. तसेच सर्वबाद 263 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजी आलेल्या भारताने 262 धावा केल्या. यामुळे ऑस्ट्रेलियाकडे एका धावेची आघाडी होती.दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची फलंदाजी अक्षरश:ढेपाळली. ऑस्ट्रेलियाने 113 धावा आणि 1 धाव मिळून एकूण 114 धावा केल्या.भारतासमोर विजयासाठी 115 धावांचं आव्हान ठेवलं. भारतानं हे आव्हान 4 गडी गमवून तिसऱ्या दिवशीच पूर्ण केलं.
मोठ्या विजयामुळे भारताला आयसीसी वर्ल्ड चॅम्पियनशिप गुणतालिकेत जबरदस्त फायदा झाला आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात आता फक्त दोन अंकांचा फरक पडला आहे. त्यामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम फेरीचा सामना रंगणार असंच चित्र दिसत आहे. आयससीसी गुणतालिकेत ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर, तर भारतानं आपलं दुसरं स्थान कायम ठेवलं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने भारताला ही कसोटी मालिका 3-0 ने जिंकायची आहे. भारतासाठी तिसरा कसोटी सामना महत्त्वाचा आहे.
दिल्ली कसोटीच्या दुसऱ्याडावात जाडेजाची जादू चालली. त्याने आपलं सर्वश्रेष्ठ प्रदर्शन केलं. ऑस्ट्रेलियाच्या एक-दोन नव्हे, तब्बल सात बॅटसमन्सना त्याने तंबूत पाठवलं. जाडेजाने दुसऱ्याडावात 12.1 ओव्हर्समध्ये 42 धावा देऊन 7 विकेट घेतल्या. टेस्ट क्रिकेटच्या एका इनिंगमध्ये रवींद्र जाडेजाच हे करिअरमधील सर्वोत्तम प्रदर्शन आहे. याआधी रवींद्र जाडेजाने 48 धावा देऊन 7 विकेट काढल्या होत्या. 2016 साली इंग्लंड विरुद्ध चेन्नई कसोटीत जाडेजाने हे प्रदर्शन केलं होतं.
जाडेजाने दिल्ली कसोटीच्या दुसऱ्याडावात सात विकेट काढले. त्यात पाच बॅट्समनना क्लीन बोल्ड केलं. मागच्या 50 वर्षात दुसऱ्यांदा असं झालय, जेव्हा कुठल्या स्पिनरने 5 बॅट्समनना एका इनिंगमध्ये बोल्ड केलय. याआधी अनिल कुंबळेने 1992 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्गमध्ये अशी कामगिरी केली होती. वेगवान बॉलर्समध्ये पाकिस्तानचा शोएब अख्तर अशी कामगिरी करणारा शेवटचा बॉलर आहे. त्याने 2002 साली न्यूझीलंड विरुद्ध लाहोरमध्ये असं यश मिळवलं होतं.
दुसऱ्या कसोटीत 7 विकेट्ससह जाडेजाने बाद केलेल्या एकूण विकेटची संख्या 10 झाली आहे. त्याने 110 धावा दिल्या. जाडेजाने दिल्ली कसोटीच्या पहिल्या डावात 3 विकेट घेतल्या होत्या. ऑस्ट्रेलिया विरुद्ध चालू बॉर्डर-गावस्कर सीरीजच्या पहिल्या दोन कसोटीत जाडेजाने एकूण 17 विकेट काढल्यात. 2 वेळा त्याने 5 पेक्षा जास्त विकेट काढल्यात. दिल्ली कसोटीत 10 विकेट घेण्याआधी त्याने नागपूर कसोटीत 7 विकेट घेतल्या होत्या.