अहमदनगर,दि.१७ फेब्रुवारी,(प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य पेन्शनर्स संघटनेच्या वतीने सोमवारी (दि.20 फेब्रुवारी) श्रीरामपूरला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून, या मेळाव्यात पेन्शनधारकांना किचकट असलेल्या हायर पेन्शनचा ऑनलाइन फॉर्म कसा भरावा? यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील पेन्शनधारकांचा सहभागी होण्याचे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
श्रीरामपूर नगरपरिषद टिळक वाचनालयाच्या हॉलमध्ये सकाळी 11 वाजता या मेळाव्याला प्रारंभ होणार आहे. या मेळाव्यासाठी खासदार सदाशिव लोखंडे, निवृत्ती कर्मचारी 1995 समन्वय समिती राष्ट्रीय संघटनेचे अध्यक्ष प्रकाश येंडे, महाराष्ट्र राज्य पेन्शन संघटनेचे अध्यक्ष एस.एल. दहिफळे, सरचिटणीस सुभाष कुलकर्णी उपस्थित राहणार असल्याची माहिती उपाध्यक्ष बाबुराव दळवी यांनी दिली.
ज्यांना हायर पेन्शन हवी आहे, अशाच निवृत्ती वेतनधारकांनी पीएफ कायदा 1952 च्या 26 (6) व पेन्शन कायदा 11/3 खाली ऑपशन फॉर्म मालकाच्या संमतीने व सहीने भरून दिला होता. अशाच पेन्शन धारकांनी हा फॉर्म भरावा. 4 नोव्हेंबर 2022 च्या सर्वोच्च न्यायालयाने आर.सी. गुप्ता प्रकरणातील पात्र कामगारांना 8 आठवड्याच्या आत पेन्शन केसेस निकाली काढा, असे म्हटले. त्यात विकल्प देण्याबाबतचा उल्लेख नसताना केंद्रीय भविष्य निर्वाह निधी संघटनेने 29 डिसेंबर रोजी जे परिपत्रक काढले ते सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे पूर्णतः विसंगत असून, त्यामुळे लाखो कामगारांचा भ्रमनिरास झाला असल्याचे संघटनेने म्हंटले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची माहिती देऊन फॉर्म कसे भरायचे ते या मेळाव्यात सांगण्यात येणार आहे. या मेळाव्यासाठी उपाध्यक्ष ज्ञानदेव आहेर, बाबासाहेब गाढे, अंकुश पवार, चिटणीस भागिनाथ काळे, खजिनदार अशोक पवार, चिटणीस बाळासाहेब चव्हाण, आबासाहेब सोनवणे, अशोक पाटील आदी पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.