Homeनगर शहरशहरातील स्वच्छतेबाबत तातडीने उपाययोजना करा

शहरातील स्वच्छतेबाबत तातडीने उपाययोजना करा

राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाचे मनपा प्रशासनाला निवेदन

अहमदनगर,दि.२७ डिसेंबर, (प्रतिनिधी) – शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून, नागरिकांच्या आरोग्याबाबत काळजी घेऊन तातडीने शहर स्वच्छतेसाठी उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या शिष्टमंडळाने अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे यांची भेट घेऊन शहरात साचलेला कचरा व अस्वच्छतेबाबत प्रश्‍न मांडले. शहरात स्वच्छता मोहिमच गारठली असून, कचरामुक्त नव्हे तर कचरायुक्त शहर बनल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी अल्पसंख्याकचे शहर जिल्हाध्यक्ष साहेबान जहागीरदार, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिकराव विधाते, विद्यार्थी सेलचे वैभव ढाकणे, केडगाव अध्यक्ष भरत गारूडकर, गणेश बोरुडे, शहानवाज शेख, मारुती पवार, अब्दुल खोकर, हनजला खान, वसीम शेख, शाहरुख शेख, फैरोज पठाण आदी उपस्थित होते.

अतिरिक्त आयुक्त पठारे यांनी या प्रश्‍नाबाबत तातडीने दखल घेऊन घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख यांना बोलावून शहरातील कचरा व अस्वच्छतेबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या. यावर घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख यांनी नागरिकांच्या आरोग्याबाबत काळजी घेऊन तातडीने शहर स्वच्छतेसाठी उपाय योजना करण्याचे लेखी आश्‍वासन दिले. कर्मचार्‍यांमार्फत दैनंदिन साफसफाई करण्याची वेळ पहाटे 5:30 वाजता करण्यात येईल, दैनंदिन कचरा न उचलल्यास ठेकेदार संस्थेवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येते आहे. शहर कचरामुक्त करण्याच्या दृष्टीने प्रशासनामार्फत कार्यवाही सुरू आहे. कचरा संकलन करणारी घंटागाडी दैनंदिन प्रत्येक प्रभागात जाण्यासाठी ठेकेदाराला सूचना देण्यात आल्याचे लेखी आश्‍वासनात म्हंटले आहे.
शहरात सफाई कर्मचारी व घंटागाड्याच्या माध्यमातून काळजीपूर्वक स्वच्छता होत नसल्याने संपूर्ण शहर व उपनगरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. शहरातील विविध रस्ता व परिसराच्या कडेला मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसून येत आहे. सफाई कर्मचारी दररोज झाडलोट करत नसल्याने अस्वच्छता पसरत चालली आहे. याकडे मनपाचे स्वच्छता निरीक्षकांचे देखील लक्ष नाही. अनेक कर्मचारी हजेरी लाऊन कामावर नसल्याचे धक्कादायक प्रकार घडत आहे. स्वच्छता निरीक्षकांशी संपर्क साधल्यास ते देखील उपलब्ध होत नसल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

घंटागाड्या मनमानी पध्दतीने कचरा संकलनाचे काम करत आहे. अनेक ठिकाणी घंटागाड्या येत नसल्याने नागरिकांना दोन-तीन दिवस कचरा घरामध्येच साठवावा लागत आहे. पर्यायाने घंटागाडी न आल्यास नागरिक जमा झालेला कचरा मोकळ्या जागेत किंवा रस्त्याच्या कडेला टाकत आहे. मंगलबाजार, कापडबाजार व इतर गर्दीच्या ठिकाणी पुरेश्या प्रमाणात स्वच्छता होत नाही. शहरातील भाजीपाला, फळ विक्रेते, हॉटेल चालक, दुकानदार व इतर व्यावसायिकांपर्यंत घंटागाड्या पोहचत नसल्याने ते देखील साचलेला कचरा नाईलाजास्तव रस्त्यावर अथवा मोकळ्या जागेत टाकत आहे. परिणामी शहरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरली असल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
शहरातील अस्वच्छतेमुळे दुर्गंधी व आरोग्याचा प्रश्‍न उद्भवत आहे. घाणीच्या साम्राज्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, यातून साथीचे आजार पसरत आहे. तात्काळ महापालिका प्रशासनाने शहर स्वच्छतेसाठी उपाययोजना कराव्या, दररोज वेळेवर घंटागाड्या कचरा संकलनासाठी  पाठविण्याचे नियोजन करावे, कामचुकार स्वच्छता कर्मचार्‍यांवर कारवाई करावी व नागरिकांना स्वच्छतेबाबत तक्रार मांडण्यासाठी महापालिकेने हेल्पलाईन नंबर उपलब्ध करुन देण्याची मागणी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!