अहमदनगर,दि.१६ फेब्रुवारी,(प्रतिनिधी) – अहमदनगरमध्ये भरीव काम करणाऱ्या डॉ. राजेंद्र भोसले यांची मुंबई उपनगरात बदली झाली आहे. भोसले यांनी २०२० मध्ये नगरची सूत्रे घेतली होती. त्यांच्या यांच्या कार्यकाळात जिल्हाधिकारी कार्यालयाचे नवीन वास्तूत स्थलांतर झाले. त्यांची डायरी पद्धत महसूल विभागात प्रसिद्ध आहे. प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची पद्धत होती. त्यांच्या जागेवर सिद्धराम सालीमठ आले आहेत. त्यांनी सोलापूरमध्ये असताना पंढरपूर यात्रेच्या नियोजनात मोठे काम केले होते. डॉ. भोसले यांचा सप्तपदी अभियानाचा उपक्रम राज्यभर गाजला. थेट शेवटच्या घटकास सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी ते नेहमी आग्रही असत. मुंबई उपनगरातील जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या जागेवर ते बदलून गेले आहेत. अहमदनगरचे नवे जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी बुधवारी पदभार स्वीकारला यावेळी मावळते जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
नवे जिल्हाधिकारी सालीमठ हे १९९५ साली उपजिल्हाधिकारी म्हणून शासकीय सेवेत आले होते. २०११ साली अप्पर जिल्हाधिकारी म्हणून त्यांना बढती मिळाली. २०२० रोजी पदोन्नतीने भारतीय प्रशासकीय सेवेत त्यांची सेवा वर्ग झाली. बढतीनंतर पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. त्यानंतर त्यांची सिडकोत सहसंचालक म्हणून बदली झाली. मात्र, त्यांनी कौटुंबिक कारणास्तव तेथील चार्ज घेतला नव्हता. सिंधुदुर्ग, जव्हार, सावंतवाडी, पालघर आदी ठिकाणी त्यांनी उपजिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले होते. उद्या (बुधवारी) ते नगर येथील जिल्हाधिकारीपदाची सूत्रे डॉ. भोसले यांच्याकडून घेणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.