अहमदनगर,दि.१५ फेब्रुवारी,(प्रतिनिधी) – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद अहमदनगर शाखेच्या वतीने “कलारंग महोत्सव” २०२३ चे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवाचे स्वागताध्यक्ष आमदार संग्राम जगताप आहेत. या महोत्सवात महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धा अहमदनगर केंद्रातील प्रथम क्रमांक विजेते रंगकर्मी प्रतिष्ठान अहमदनगर या संस्थेचे व श्री.अरविंद लिमये लिखित, श्री.नाना मोरे दिग्दर्शित नाटक “एका उत्तराची कहाणी” आणि द्वितीय क्रमांक विजेते अहमदनगर जिल्हा हौशी नाट्य संघ निर्मित तुमचं आमचं प्रस्तुत श्री.कृष्णा वाळके लिखित व दिग्दर्शित आणि सतीश लोटके निर्मित “म्हातारा पाऊस” या नाटकांचा प्रयोग अनुक्रमे १५ आणि १६ फेब्रुवारी २०२३ रोजी रात्री ८:०० वाजता माऊली सभागृह ,अ’नगर येथे कलारंग महोत्सवात सादर होणार आहेत अशी माहिती अध्यक्ष श्री.अमोल खोले यांनी दिली.
अहमदनगरच्या नाट्य चळवळीत सादर होणाऱ्या उत्तम कलाकृती रसिक प्रेक्षकांना पाहायला मिळाव्यात आणि यातून कलाकारांना प्रोत्साहन मिळावे व नाट्य चळवळ अधिक प्रभावी व्हावी ह्या हेतूने जिल्ह्यातील कलावंतांना नाट्य परिषदेच्या वतीने रंगमंच उपलब्ध करून दिला जात आहे. तसेच राज्य नाट्य स्पर्धेतील सर्व विजेत्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे असे प्रमुख कार्यवाह श्री.सतीश लोटके यांनी सांगितले.
कलारंग महोत्सवाचे उदघाटन आमदार संग्राम जगताप, जेष्ठ नाट्यकर्मी प्रकाश धोत्रे, डॉ. सोमनाथ मुटकुळे, डॉ. संजय दळवी, डॉ.बाळासाहेब सागडे, क्षितीज झावरे, संजय लोळगे, श्रेणीक शिगंवी, अशोक कर्णे, संदीप रसाळ, डॉ. मफीज इनामदार, अविनाश ओहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. नाट्य प्रयोग विनामूल्य असून काही जागा निमंत्रितांसाठी राखीव आहेत अशी माहिती उपाध्यक्ष शशिकांत नजान यांनी दिली.