अहमदनगर,दि.११ फेब्रुवारी,(प्रतिनिधी) – पुरोगामी महाराष्ट्रात शाहू, फुले, आंबेडकर यांचे खरे विचार रुजविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस माजी सैनिक सेलच्या वतीने काढण्यात आलेल्या राज्यव्यापी महाप्रबोधन यात्रेचे राष्ट्रवादीच्या वतीने शहरात स्वागत करण्यात आले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती शताब्दी आणि भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पुणे येथून ही महाप्रबोधन यात्रा सुरु झाली असून, त्याचे पहिले स्वागत नगर शहरात करण्यात आले.
शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात झालेल्या स्वागत कार्यक्रमाप्रसंगी महाप्रबोधन यात्रेत सहभागी असलेले मुंबई उच्च न्यायालयाचे मेडिएटर अॅड. संभाजीराव मोहिते, राष्ट्रवादी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष दीपक शिर्के, सरचिटणीस बाबासाहेब जाधव, प्रदेश संघटक वसंत अजमाने, चंद्रकांत ठोंबरे, शहाजी जाधव, मेजर शिरीष पवार, जिल्हाध्यक्ष पांडुरंग शिरसाठ यांचा राष्ट्रवादीच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते यांनी सत्कार केला. यावेळी उद्योग व व्यापार सेलचे अनंत गारदे, अर्बन सेलचे प्रा. अरविंद शिंदे, राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, ओबीसी सेलचे आमित खामकर, माजी सैनिक शिवाजी पालवे, केडगाव अध्यक्ष भरत गारुडकर, गणेश बोरुडे, मारुती पवार, अनिकेत येमूल आदींसह माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या महाप्रबोधन यात्रेतून शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करुन समाजात समता, बंधुत्व रुजविण्याचे प्रयत्न केले जात आहे. शुक्रवारी (दि.10 फेब्रुवारी) सकाळी पुणे येथून सुरु झालेली महाप्रबोधन यात्रा शहरात दाखल झाली होती. ही यात्रा दि.9 एप्रिल पर्यंत चालणार आहे. राज्यातील विविध भागातून मार्गक्रमण करुन याचा समारोप पुणे येथे होणार आहे. तसेच राज्यातील माजी सैनिकांना देखील या यात्रेनिमित्त जोडण्याचे काम करण्यात येत आहे.
प्रास्ताविकात सैनिक सेलचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग शिरसाठ यांनी या महाप्रबोधन यात्रेचा उद्देश स्पष्ट केला. प्रा. माणिक विधाते म्हणाले की, महापुरुषांच्या विचारांची समाजाला गरज आहे. शाहु, फुले, आंबेडकर यांच्या विचारानेच राष्ट्रवादी पक्ष कार्य करत आहे. या रॅलीच्या माध्यमातून बहुजन समाज जोडला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी बिभीषण गळगळे यांची राष्ट्रवादी सैनिक सेलच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष दीपक शिर्के म्हणाले की, माजी सैनिक चळवळीचा या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळणार आहे. लोकशाही मजबूत होण्यासाठी शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्याची गरज आहे. हे विचार पोहोचविण्यासाठी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या संकल्पनेतून ही प्रबोधन यात्रा सुरू झाली असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई उच्च न्यायालयाचे मेडिएटर अॅड. संभाजी मोहिते म्हणाले की, महापुरुषांचे विचार भावी पिढीला देणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. या विचाराने समाजाला एक दिशा मिळणार आहे. राज्यघटनेचा भक्कम पाया राजश्री शाहू महाराजांनी घातला. मातीशी इमान राखणारा व सर्वसामान्यांशी एकरुप होणारा राजा पुरोगामी महाराष्ट्रात होऊन गेला. शिक्षणाने समाजाची प्रगती साधण्यासाठी त्यांनी बहुजन समाजाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य केले. समाजातील अस्पृश्यता शिक्षणाने नष्ट करण्यासाठी त्यांनी कोल्हापूरला विविध वस्तीगृहांची स्थापना केली. अठरापगड जातीचे मुलं त्यांनी एका छताखाली आणली. समाज जोडण्यासाठी अनेक महापुरुषांनी बलिदान दिले, मात्र आज धर्मा-धर्मात व समाजात विष पेरले जात आहे. समाजव्यवस्था भक्कम करण्यासाठी शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तर कपड्यांपासून खाणे-पिण्यापर्यंत पुन्हा जातीय व्यवस्था निर्माण करण्याचे काम केले जात आहे. याबाबत जागरूक होण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अरविंद शिंदे यांनी केले. आभार इंजि. केतन क्षीरसागर यांनी मानले.