मुंबई, दि.१५ जानेवारी, – नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवासी विमान धावपट्टीवर कोसळले आहे. ही घटना सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. दरम्यान तत्काळ बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. घटनेमुळे सध्या विमानतळ बंद आहे. दरम्यान आतापर्यंत विमानातून ४५ प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आलेत. यात पाच भारतीयांचा समावेश आहे, अशी माहिती नेपाळच्या माध्यमांनी दिली आहे.
अपघाताबाबत माहिती देताना यति एअरलाइन्सचे प्रवक्ते सुदर्शन बर्तौला यांनी सांगितले की, जुने विमानतळ आणि पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळादरम्यान कोसळलेल्या विमानात एकूण ६८ प्रवासी आणि चार क्रू मेंबर्स होते. नेपाळच्या सरकारी वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार यामध्ये १० विदेशी नागरिक होते. अपघाताच्या घटनेनंतर मदत आणि बचाव कार्य सुरु झाले आहे. अपघातानंतर विमानतळ सर्व प्रकारच्या विमानोड्डाण आणि लँडींगसाठी बंद ठेवण्यात आले आहे. कमल के सी हे या विमानाचे कॅप्टन होते. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या चित्रे आणि व्हिडिओंमध्ये अपघातस्थळावरून धुराचे लोट उठताना दिसत आहेत. अपघातस्थळी हेलिकॉप्टरद्वारे बचाव पथक तैनात करण्यात आले आहे.
नेपाळच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार, विमानाने काठमांडू येथून सकाळी १०.३३ वाजता उड्डाण केले. विमान पोखरा विमानतळावर लँडिंगच्या अगदी जवळ असताना सेती नदीच्या काठावर कोसळले. उड्डाणानंतर सुमारे २० मिनिटांनी हा अपघात झाला, असे सूचित केले जात आहे की विमान खाली उतरत असावे. दोन शहरांमधील फ्लाइटची वेळ २५ मिनिटे आहे. यती एअरलाइन्सने चालवलेले ट्विन-इंजिन एटीआर ७२ विमान नेपाळची राजधानी काठमांडू येथून जात होते, असे एका अधिकाऱ्याने वृत्तसंस्था रॉयटर्सला सांगितले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेली चित्रे आणि व्हिडिओमध्ये अपघातस्थळावरून धुराचे लोट उठताना दिसत आहेत.