अहमदनगर,(प्रतिनिधी) – प.पू माताजी श्रीनिर्मला देवी यांचा २१ मार्च २०२४ हा १०१ वा वाढदिवस मध्यप्रदेश येथील छिंदवाडा येथे मोठया प्रमाणात व भव्य स्वरूपात साजरा होत असून या कार्यक्रमासाठी १०० पेक्षा जास्त देशातील सहजयोगी तसेच भारतातील प्रत्येक राज्यातील सहजयोगी मोठया संख्येने उपस्थित होणार आहेत.
२१ मार्च १९२३ रोजी श्रीमाताजींचा जन्म मध्यप्रदेशातील छिंदवाडा या गावात झाला. भौगोलिकरित्या छिंदवाडा हे गाव भारताचा मध्यबिंदू आहे. तसेच २१ मार्च हा दिवस वर्षाचाही मध्यबिंदू १२ तास रात्र अन् १२ तास दिवस अशी ही तिथी. त्या दिवशी भरदुपारी १२ वाजेच्या सुमारास म्हणजे वर्षाच्या मध्यबिंदू असलेल्या दिवशी मध्यान्हावेळीचा त्यांच्या जन्माचा अनोखा योगायोग. देशभक्तीचा वारसा असणाऱ्या त्यागी कुटुंबात श्रीनिर्मला देवी या लहानाच्या मोठ्या झाल्या. १९४२ च्या काळात महात्मा गांधी यांच्या भारत स्वातंत्र्य आंदोलनात त्या सक्रिय झाल्या. नागपूर येथे तिरंगा हातात घेऊन शस्त्रानिशी असलेल्या इंग्रजांचा त्यांनी धिरोदत्तपणे प्रतिकार केला. पिताश्री बॅरिस्टर प्रसाद साळवे यांच्यासमवेत माताजींना गांधींचा सहवास लाभला. पाकिस्तानातील लाहोर येथे एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी चंद्रीकाप्रसाद श्रीवास्तव यांच्यासोबत ७ एप्रिल १९४७ रोजी त्या विवाहबध्द झाल्या. पढे श्रीवास्तव हे लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचे ज्येष्ठ सहसचिव म्हणून नियुक्त झाले. त्यानंतर शिपिंग कंपनीचे ते अध्यक्षही झाले. राष्ट्रीय पुर्ननिर्माण व विकास कार्यात तरूण पिढीच्या शक्तीचा उपयोग व्हावा यासाठी १९६१ मध्ये माताजींनी यूथ सोसायटी फॉर फिल्मस नावाची संस्था सुरू केली. नोकरीनिमित्त श्रीवास्तव यांनी जगभर भ्रमंती केली. या दाम्पत्याला दोन कन्यारत्नही झाले. त्यांच्यासोबत श्रीमाताजींही जगभर फिरल्या. त्या काळात यांनी जगाच्या पाठीवर प्रत्येक देशाची संस्कृती व जीवनशैलीचा अभ्यास केला.
पतीसोबत असतानाच जगातील पूर्वेकडील मानव समाजात संस्काराचा तर पश्चिमेकडे अंहकाराचा प्रश्न गंभीर बनत असल्याचे लक्षात आल्यानंतर या दोन्हीकडील लोकांनी श्रीमाताजी आत्म साक्षात्कार कसा देता येईल याबाबत विचार करत होत्या. त्याच सुमारास पतीच्या अपरोक्ष ४ मे १९७० रोजी नारगोळ येथे श्रीमाताजींना समुद्र किनाऱ्यावर रात्रभर ध्यानधारणा सुरू केली. ५ तारखेच्या पहाटेच्या सुमारास त्यांनी समस्त मानवाच्या कल्याणासाठी सहस्त्रार उघडले. तेथून पुढे त्यांनी सहजयोग ध्यानधारणेस सुरूवात केली. श्रीमाताजींनी जगभरात विश्वशांतीसाठी सहजयोग ध्यानसाधनेचे कार्य केले. अनेक देशांनी त्यांना सन्मानपत्र देऊन श्रीमाताजींचा गौरव केला. फिलोडेल्फियात १५ ऑक्टोबर तर सीनसिनाटी या देशात १० सप्टेंबर हा दिवस श्रीमाताजी निर्मलादेवी दिवस म्हणून साजरा केला जातो. न्यूयार्कमध्ये श्रीमाताजींना तेथील पोलिसांनी मानवंदना देत स्वागत केल्याची नोंद दप्तरी आहे. १९८९ ते १९९४ सलग पाच वर्षे श्रीमाताजींना विश्वशांती मार्गदर्शनासाठी युनोने आमत्रंति केले होते.
आज जगातील १४० देशापेक्षा जास्त देशात सहजयोग ध्यानसाधना करणारे साधक आहेत. अनेक देशात श्रीमाताजी यांचे आश्रम आहेत. देशातील प्रत्येक राज्यात व जिल्ह्यात सहजयोग ध्यानकेंद्रे अविरत सुरू असून ती विनामुल्य चालविली जातात. जातपातीचा भेदभाव न करता सर्व धर्मियांसाठी ही ध्यानसाधना खुली आहे.