मुंबई , १७ जानेवारी २०२३ –
सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष अर्ज दाखल केल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसने काल सत्यजीत तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यानंतर आता सत्यजीत तांबे यांनी काँग्रेस सोडण्याचे संकेत दिले आहे. सत्यजीत तांबे यांनी ट्विटर आणि फेसबुकवरील बायोतून पक्षाचं नाव हटवल्याने चर्चांना उधाण आलं आहे. दुसरीकडे त्यांच्या पोस्टची चर्चाही सोशल मीडियावर सुरु आहे.
माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ऐनवेळी अर्ज दाखल केला नाही. तर दुसरीकडे सत्यजीत तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे काँग्रेस हायकमांडने सत्यजीत तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील सत्यजीत तांबे यांच्यावरील कारवाईला दुजोरा दिला आहे.
काँग्रेसच्या निलंबनाच्या कारवाईनंतर सत्यजीत तांबे यांनी पक्ष सोडण्याचे संकेत दिले आहे. ट्विटर आणि फेसबुकवरील बायोतून पक्षाचं नाव हटवलं आहे. ‘वारसाने संधी मिळते परंतु कर्तृत्व हे सिद्ध करावच लागते, असा आशयाचा संदेश कव्हरपेजवर सत्यजित तांबे यांनी लिहिला आहे.
” जी माणसं माझ्या कठीण काळात माझ्या बरोबर असतील त्यांना माझा शब्द आहे, माझा चांगला काळ फक्त तुमच्यासाठीच असेल..” अशा आशयाच्या सत्यजित तांबे यांच्या पोस्टची चांगलीच चर्चा रंगली आहे. तांबे यांचे समर्थक सोशल मीडियावर ही पोस्ट व्हायरल करताहेत.
नाशिक पदवीधर निवडणुकीत ऐनवेळी अपक्ष उमेदवारी करणारे सत्यजित तांबे कोणत्या राजकिय पक्षाच्या साथीने निवडणुकीला सामोरे जातात हे अद्याप स्पष्ट नसले तरी त्यांच्या आवाहनाला समर्थक मात्र प्रतिसाद देताना दिसताय.