मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून धावणाऱ्या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसमधून अलिशान प्रवासाचे नियोजन करणाऱ्या सर्व प्रवाशांना खिसा रिता करावा लागणार आहे. मुंबई-शिर्डी (नाशिकमार्गे) आणि मुंबई- सोलापूर (पुणेमार्गे) मार्गावरील ‘वंदे भारत’चे तिकीटदर आतापर्यंतचे सर्वाधिक आहेत. या तिकीटदरांत आयआरसीटीसीच्या खाद्यपदार्थांचा समावेश नाही. यामुळे प्रवासात चमचमीत खाण्यासाठी आणखी पैसे भरावे लागणार आहे.
येत्या तीन दिवसांत दोन नव्या गाड्या मुंबईतून धावणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यांना हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. मुंबई-सोलापूर मार्गावर धावणाऱ्या ‘वंदे भारत’ एक्स्प्रेससाठी पुण्यापर्यंत चेअर कार डब्यात ५६० रुपये तर सोलापूरसाठी ९६५ रुपये मोजावे लागणार आहेत. एक्झिक्युटीव्ह श्रेणीसाठी १,१३५ रुपये तर मुंबई-सोलापूर या संपूर्ण प्रवासासाठी १,९७० रुपये मोजावे लागतील. मुंबई-साईनगर शिर्डी ‘वंदे भारत’चे नाशिक रोडपर्यंतचे चेअर कार तिकीट ५५० आणि शिर्डीसाठी ८०० रुपये असे आहे. एक्झिक्युटिव्ह श्रेणीसाठी अनुक्रमे ११५० आणि १६३० असे तिकीट दर असणार आहेत, असे रेल्वेतील सूत्रांनी सांगितले.
वंदे भारत’च्या रूपाने राज्यातील दोन महत्त्वाच्या आणि मोठ्या शहरांना जोडणारी आणखी एक गाडी सेवेत दाखल होणार आहे. मुंबई-सोलापूर ‘वंदे भारत’ एक्स्प्रेस दुपारी ४.१०ला मुंबईहून रवाना होणार असून पुण्यात सायंकाळी ७.१०ला पोहोचेल; तर सोलापूरला रात्री १०.४०ला मुक्कामी असणार आहे. सोलापूरहून परतीचा प्रवास सकाळी ६.०५ वाजता सुरू होणार असून, पुण्याला नऊ वाजता आणि सीएसएमटीला दुपारी १२.३५ वाजता संपणार आहे.
मुंबई ते शिर्डी हे अंतर पार करण्यासाठी ‘वंदे भारत’ एक्स्प्रेसला पाच तास २० मिनिटे आणि मुंबई ते सोलापूर अंतर पार करण्यासाठी सहा तास ३० मिनिटे लागणार आहेत. यामुळे चहा आणि नाश्त्यासाठी अधिक रुपये खर्च करावे लागतील. रेल्वेने ठरवलेल्या प्राथमिक दरांमध्ये आयआरसीटीसीच्या खाद्यपदार्थांचा समावेश केलेला नाही, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.