मुंबई,दि.१२ फेब्रुवारी,(ऑनलाईन प्रतिनिधी) – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर केला आहे. त्यामुळे आता भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्राच्या राज्यपालपदावरुन पायउतार होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालपदी रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या सगळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपल्या खास शैलीत टिप्पणी केली. राष्ट्रपतींनी कोश्यारींचा राजीनामा मंजूर केला. माझ्या मते महाराष्ट्राची सुटका झाली. हा अत्यंत चांगला निर्णय आहे, यापूर्वीच तो झाला पाहिजे होता. महाराष्ट्राने आजवर अशी व्यक्ती कधी राज्यपाल झालेली पाहिली नव्हती, ती आपण पाहिली. पण आता केंद्र सरकार आणि राष्ट्रपतींनी त्याबाबत बदल केला, ही समाधानाची बाब आहे.
मोदी सरकारच्या काळात राज्यपालांचा ५ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच लडाखचे नायब राज्यपाल आर.के.माथूर आणि महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा दिला आहे. लडाखमध्ये केंद्रविरोधी आंदोलन सुरू झाल्यामुळे आर.के.माथूर यांनी राजीनामा दिला तर, महाराष्ट्रात सातत्याने वादग्रस्त वक्तव्यांची मालिका सुरू होती त्यामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोरात सुरू होती. अखेर त्यांनी राजीनामा दिला असून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी तो मंजूर केला आहे.