अहमदनगर,दि.९ फेब्रुवारी,(प्रतिनिधी) – रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांची निर्घृण हत्या झाली. तसेच गेल्या आठ दिवसात केज, मुखेड, धुळे आदी ठिकाणी पत्रकारांवर झालेले हल्ले किंवा खोटे गुन्हे दाखल करण्याच्या घटनांचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी (दि. 10 फेब्रुवारी) सकाळी 11 वाजता अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पत्रकार काळ्या फिती लावून निदर्शने करून जिल्हाधिकार्यांना निवेदन देणार आहेत. मराठी पत्रकार परिषदेची गुरुवारी (दि. 9 फेब्रुवारी) संघटनेचे मुख्य विश्वस्त एस.एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, राज्य सरचिटणीस मन्सुरभाई शेख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ऑनलाइन बैठक झाली.
राज्यातील पत्रकारांवर होणार्या हल्ल्याच्या संदर्भात चर्चा होऊन सर्व पत्रकार, संघटनांना बरोबर घेऊन राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. पत्रकारांवर हल्ले होण्याच्या घटना सातत्यानं वाढत असल्याने पत्रकारांमध्ये भिंतीची भावना निर्माण होत आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी तसेच पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी शुक्रवारी (10 फेब्रुवारी) रोज आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शुक्रवारी मराठी पत्रकार परिषद अहमदनगर शाखेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व पत्रकार संघटनांसोबत घेऊन अहमदनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. मराठी पत्रकार परिषदेचे राज्य सरचिटणीस मन्सुरभाई शेख यांनी ही माहिती दिली. या आंदोलनामध्ये काळ्या फिती लावून जिल्ह्यातील पत्रकारांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे अहमदनगर दक्षिणचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके यांनी केले आहे.