अहमदनगर,दि.१२ फेब्रुवारी,(ऑनलाईन प्रतिनिधी) – चित्रकूट तुरुंगात आमदार अब्बास अन्सारी याला भेटण्यासाठी आलेली त्याची पत्नी निखत अन्सारी हिला अटक करण्यात आली आहे. निखतची तिच्या पतीसोबत जेलरच्या खोलीत दररोज गुप्त भेट होत होती. पोलिसांनी महिलेकडून मोबाईल आणि रोख रक्कमेसह अवैध वस्तूही जप्त केल्या. यासोबतच अब्बास, निखत आणि कारागृह अधीक्षकांसह अन्य तुरुंग कर्मचाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस एएसआयने दिलेल्या माहितीनुसार, बांदा तुरुंगात बंद असलेला कुख्यात गुंड मुख्तार अन्सारीचा मुलगा अब्बास अन्सारी हा मऊ मतदारसंघाचा आमदार असून तो चित्रकूट तुरुंगात बंद आहे. खबऱ्याने माहिती दिली की, अब्बासची पत्नी निखत बानो तिचा ड्रायव्हर नियाजसोबत गेल्या अनेक दिवसांपासून दररोज सकाळी 11 वाजता तुरुंगात जात असे. तसेच आमदार पतीसोबत 3-4 तास वेळ घालवून परत जाते.
एफआयआरनुसार, निखत बानो यांना अब्बास अन्सारी याला भेटण्यासाठी कोणत्याही परवानगी किंवा बंधनाची गरज नव्हती. अब्बास याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे अनेक खटले न्यायालयात प्रलंबित आहेत. चित्रकूट तुरुंगात असताना अब्बासने आपल्या पत्नीचा मोबाईल फोन वापरून साक्षीदार आणि फिर्यादी अधिकाऱ्यांना धमकावले आणि पैशांची मागणीही केली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, अब्बासची पत्नी तुरुंगातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सर्व प्रकारच्या भेटवस्तू, पैसे देत होती. त्या बदल्यात तुरुंगात पतीला भेटता येत होतं. शिवाय पतीला सुविधाही पुरवल्या जात होत्या. एवढेच नाही तर निखतचा ड्रायव्हर नियाज हा जेल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मदतीने अब्बासला तुरुंगातून पळवून नेण्याचा कट रचत होता.