पुणे,दि.१२ फेब्रुवारी,(प्रतिनिधी) -पिंपरी चिंचवडमध्ये जमीन खोदण्याच्या टिकावाने पती आणि पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. इतकेच नाही तर खून केल्यानंतर आरोपी रक्ताने माखलेल्या अवस्थेत रस्त्यावरून फिरत होता. स्थानिक नागरिकांनीच त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेने दापोडी परिसरात एकच खळबळ उडाली होती.
आरोपी रक्ताने माखलेला टिकाव घेऊन रस्त्यावर फिरत होता. या प्रकरणी आरोपीला भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शंकर नारायण काटे (वय- 60) आणि संगीता काटे (वय- 55) अशी हत्या झालेल्या पती-पत्नींची नावे आहेत. प्रमोद मगरुडकर (वय- 47) असे आरोपीचे नाव असून त्याला भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की दापोडीत काटे कुटुंब बऱ्याच दिवसांपासून रहात होते. बेसावध असलेल्या काटे दाम्पत्यावर टीकावाने घाव घालून दुहेरी हत्या करण्यात आली आहे. काटे दाम्पत्य हे त्यांच्या घरात बसले होते. तेव्हा, आरोपी प्रमोद त्यांच्यावर टिकावाचे घाव घातले. ही घटना शनिवारच्या रात्री दहा वाजता समोर आली आहे. आरोपी प्रमोद हा हत्या करून रक्ताने माखलेला टिकाव घेऊन रस्त्यावर दिसला. हे पाहून नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तत्काळ येऊन आरोपीला ताब्यात घेतले आहे