अहमदनगर,दि.५ फेब्रुवारी,(प्रतिनिधी) – जवळपास पूर्ण अंधत्व आलेले येथील पत्रकार अजय धोपावकर यांनी अंधत्वाचा बाऊ न करता धनेश खत्ती व डॉ. मिलिंद कांबळे या दोन मित्रांच्या मदतीने रविवारी मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग तर घेतलाच, पण जिद्दीने 10 किलोमीटर धावण्याचे उद्दिष्टही गाठले. यावेळी धावताना रस्त्यांतील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने ते दोन वेळा पडलेही. पण तरीही त्यांनी 10 किलोमीटरचे धावणे साध्य केलेच. धोपावकरांच्या या उत्साही सहभागाबद्दल अनेकांनी त्यांचे कौतुक केले.
अहमदनगर रायझिंग फाउंडेशनतर्फे किल्ला मैदान परिसरात अर्धमॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. धोपावकरांनी खत्ती व डॉ. कांबळे यांच्या मदतीने 10 किलोमीटरचे अंतर 78 मिनिटातपूर्ण केले. या कामगिरीबद्दल धोपावकर यांचा आमदार संग्राम जगताप, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, अॅड. गौरव मिरीकर, संदीप जोशी, आशाताई फिरोदिया, छायाताई फिरोदिया यांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. ही शर्यत पूर्णकरणारे धोपावकर नगर जिल्हातील एकमेव अंध धावपटू आहेत. धोपावकर हे नगरच्या रेसिडेन्शियल हायस्कूल मैदानावर अजय रसाळ, अमोल येनगेंदुल, प्रशांत मडके, अरुण ढाकणे, सचिन नराल, बाळकृष्ण येनगेंदुल, सचिन पुप्पाल, राधेशाम सपकाळे, राजेंद्रकडवा यांच्या मदतीने धावण्याचा सराव करतात. या आधीही सहा महिन्यांपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन महोत्सवानिमित्त आयोजित अर्ध मॅरेथॉनमध्ये त्यांनी 10 किलोमीटर अंतर धावण्याचे उद्दिष्ट 85 मिनिटात पूर्ण केले होते.
दोघांनी दिली मोलाची साथ
समाचार व सकाळसारख्या वृत्तपत्रांतून पत्रकारिता केलेल्या अजय धोपावकर यांना शारीरिक व्याधीमुळे अंधत्व आले आहे. ते उत्कृष्ट ज्युदोपटूही आहेत. मात्र, 2016 पासून त्यांना पूर्ण दिसणे बंद झाले आहे. मात्र,यामुळे खचून न जाता त्यांनी जिद्दीने धावण्याचा सराव रोज सकाळी सुरू ठेवला आहे. रविवारी झालेल्या मॅरेथॉनमध्ये हातात काठी घेऊन ते धावले, ती काठीपुढे कधी खत्ती धरायचे तर कधी डॉ. कांबळे व त्यांच्यामागे धोपावकर धावतहोते. रस्त्यांतील खड्डे, स्पीड ब्रेकर, उतार व अन्य अडथळे या दोघांमुळे मला पार करता आले, अशी कृतज्ञताही धोपावकर यांनी आवर्जून व्यक्त केली.